एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील गणेशपेठ बस स्थानकातील आंदोलनस्थळी भेट दिली. त्यावेळी राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ या मागण्यांसाठी राज्यात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत आहेत. मात्र आंदोलन करणे हा एसटी कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. परंतु कर्मचाऱ्यांना निलंबीत केल्यामुळे कर्मचाऱ्यांना आत्महत्येला प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे सरकारच्या चुकीच्या वागणुकीमुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून याप्रकरणाला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
सरकारने आणखी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहू नये तसेच त्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर आणू नये. तसेच कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करणे हा टोकाच पाऊल उचलू नये. यावर आत्महत्या करणे हा पर्याय नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्यांना राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. आणि आम्ही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोवर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोवर आम्ही आंदोलन करू असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.