मुंबईतील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प निर्णायक टप्प्यातून आता पुर्ण होण्याच्या वाटचालीकडे पोहोचला आहे. या लिंक रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच पुर्ण होणार असून, बीएमसीकडून 2026 पर्यंत वाहतुकीसाठी हा लिंक रोड खुला करण्याची तयारी सुरू आहे. यावेळी पश्चिमेकडील भाग जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं ठरवलं असून पूर्वेकडील भाग एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
त्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करून हा संपूर्ण फ्लायओव्हर मे 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचं बीएमसीचं लक्ष्य आहे. तब्बल 14,000 कोटी खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग पूर्ण झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरांना थेट जोडणारा चौथा प्रमुख मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे विशेषतः दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्यान नवीन प्रवासी मार्ग तयार होईल.
हा मार्ग मुंबई किनारी रस्ता, मालाड माईंडस्पेस, गोरेगाव, वीकेंडी लिंक रोड आणि ऐरोली यांना जोडेल. त्यामुळे उत्तर मुंबईतील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा 12.2 किलोमीटर लांबीचा असून या संपूर्ण मार्गावर पूल, उड्डाणपूल आणि भुयारी रस्ते अशा अत्याधुनिक सुविधांचा समावेश केला आहे. या उड्डाणपुलावर सहा वाहनमार्ग असणार आहेत तसेच उंच प्लॅटफॉर्मवर एक वर्तुळाकार चौक तयार केला जात आहे.
त्याचसोबत पुलाच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्ग तसेच डेक स्लॅब्स उभारण्यात येणार आहेत. या उड्डाणपूलासाठी एकूण 31 खांब उभारण्यात येणार असून त्यात 27 खांबांचे काम पुर्वीच पार पडले होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा दुवा गोरेगाव परिसराला दक्षिण मुंबईशी तसेच मुलुंड परिसराला पूर्व मुंबईशी थेट जोडणारा असेल.
हेही वाचा- Hsrp Number Plate : वाहनधारकांसाठी मोठी अपडेट! HSRP नंबरप्लेटची मुदत पुन्हा वाढवली
तसेच दिंडोशी कोर्टाजवळून सुरू होणार असून तो थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ उतरणार आहे. इथून वाहनचालकांना थेट जुळ्या टनेलच्या प्रवेशद्वारात शिरता येणार आहे. बीएमसीकडून हे बांधकाम काही महिन्यांपासून वेगाने सुरू होते जे आता पुर्णत्वाच्या दिशेने पोहचला आहे. त्यामुळे हा मुंबईतील महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जात आहे.