साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री सप्तशृंगी देवीचं आता व्हीआयपी दर्शन घेता येणार आहे. 13 फेब्रुवारीपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. १०० रुपयांचा पास घेऊन हे व्हीआयपी दर्शन घेता येणार आहे. श्री सप्तशृंगी देवी मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदिमायेच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. त्या दरम्यान व्हीआयपी व्यक्तींना सशुल्क व्ही आय पी दर्शन ऐच्छिक आहे.
१० वर्षाच्या आतील मुलांना व्हीआयपी पास साठी शुल्क भरावे लागणार नाही, त्यांना त्यामध्ये सूट देण्यात आली आहे. हा पास सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे. यामुळे वणीच्या देवीच जलद दर्शन होणार आहे. सह्याद्री पूर्वच्या पर्वतरांगेत असलेल्या वणी गडावर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. याशिवाय पर्यावरण प्रेमी यांची देखील मोठी उपस्थिती असते. समुद्र सपाटीपासून ४६०० फुट उंचीवर वणी गड आहे. त्याठिकाणी लाखों भाविक आई भगवतीच्या चरणी माथा टेकवतात.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेने भाविकांची दर्शन व्यवस्था सुलभ होण्याकरता हा निर्णय घेतला आहे. वर्षभरातील चैत्र आणि नवरात्र उत्सव पौर्णिमा त्याचबरोबर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार इत्यादी दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते. सदर गर्दीचे नियोजन तसेच नियंत्रण होण्यासाठी अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाने प्रति व्यक्ती १०० रुपये प्रमाणे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकला मोठ्या प्रमाणात पर्यटन आहे. त्यातच वणीच्या गडाला मोठा निसर्ग लाभलेला आहे. त्यामुळे पर्यटनाला आलेले अनेक व्हीआयपी मंडळी नाशिकच्या आजूबाजूला असलेल्या धार्मिकस्थळी भेट देत असतात. त्यामध्ये सप्तशृंगी गडाचाही समावेश आहेत.खास सशुल्क दर्शन सुविधा उपलब्ध होणार आहे.