नांदेड मध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे प्रेम संबंधाच्या विरोधातून कुटुंबातील सदस्यांनीच मुलीचा खुन करून प्रेत जाळले. २३ वर्षीय शुभांगी ही शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएस मध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती. कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी तिची सोयरिक लाऊन दिली होती. काही दिवसांवर लग्न आले असताना काही कारणामुळे आठ दिवसापूर्वी सोयरिक मोडली. मुलीमुळे गावात बदनामी झाली या कारनाने गेल्या रविवारी रात्री कुटुंबीयांनी तिची हत्या करून मृतदेह शेतात जाळून टाकला आणि राख देखिल बाजूच्या ओढ्यात टाकून दिली. या प्रकरणी पोलीसानी मुलीच्या वडील , मामा, भाऊ आणि काकाची दोन मुलं अश्या पाच जणांना अटक केली असून घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.
गावातील होणारी चर्चा, मैत्रीण तसेच पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल चार दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तरुणीच्या मैत्रिणीने तक्रार केल्याचे पोलिसांनी नाकारले आहे. अशा प्रकारे राज्य महिला आयोगाकडे कोणीही तक्रार केली नसल्याचे पोलिसांनी सांगितलंय. तरुणीशी प्रेमसंबंध असलेल्या मुलाचेही अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी वेगाने तपास सुरु केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा या प्रकरणात पाच जणांना अटक केली.