भोर : नरसापूर प्रकरणातील आरोपीच्या विरोधातील संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या 65 वर्षी नराधम भीमाजी कांबळेच्या विरोधात आता भोर तालुक्यातील वकीलदेखील एकवटले आहेत. त्या प्रकरणात कोणताही वकील आरोपीच आरोपपत्र घेणार नसल्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. याबाबतची माहिती भोर तालुक्यातील बार असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय उरणकर यांनी दिली. यावेळी उरणकर म्हणाले की, त्या नराधमाचं कृत्य हे लांछनास्पद असून त्याच आरोपपत्र न घेण्याचा निर्णय भोर तालुका बार असोसिएशनमधील सर्व वकिलांनी एकमताने घेतला आहे. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 मे रोजी तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. तसेच यासंबंधीत पुणे जिल्ह्यातील सर्व वकिलांनाही आरोपपत्र न घेण्याची विनंती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. नराधमाला कठोरात कठोर फाशीचीच शिक्षा व्हावी, असे मागणीही यावेळी वकिलांनी केली आहे.