रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात आता वस्त्रसंहिता बंधनकारक करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. पुढील वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2027 पासून मंदिरात वस्त्रसंहिता बंधनकारक असणार आहे. भाविकांसाठी ड्रेस कोडचे नियम लागू करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय घेतला असून मंदिराबाहेर वस्त्रसंहिता बंधनकारक असल्याचे सांगणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच भाविकांनी मंदिर प्रशासनाने निश्चित केलेल्या वस्त्रसंहितेचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यापूर्वी वस्त्रसंहितेबाबत केवळ आवाहन करणारे फलक लावण्यात आले होते. आता 1 जानेवारी 2027 पासून वस्त्रसंहितेची अंमलबजावणीचे फलक मंदिर प्रशासनाने लावले आहेत. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी ड्रेस कोडच्या नियमांची माहिती घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात गणपतीपुळे मंदिरात भाविकांसाठी वेशभूषेचा नियम जारी करण्यात आला होता. हा वेशभूषेचा नियम गणेशोत्सवापासून लागू करण्यात आला होता. त्यामुळे गणपतीच्या दर्शनासाठी गणपतीपुळेला जायचे असल्यास योग्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या साजेसे कपडे भाविकांनी परिधान करावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते. या संदर्भात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले होते. दररोज लाखो भाविक गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी गणपतीपुळे मंदिराला भेट देतात.