Supriya Sule: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात त्यासाठी निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही. "ही केवळ निवडणुकीपुढील घोषणाच ठरू नये," असा थेट आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून बारामती आणि पुरंदरच्या पाणीप्रश्नावर सरकारला धारेवर धरले आहे.
अजित पवारांच्या स्वप्नपूर्तीसाठी पाठपुरावा
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे, हे दिवंगत अजित पवार यांचे स्वप्न होते. कण्हेरी येथील सभेत त्यांनी या प्रकल्पासाठी 1000 कोटींची तरतूद आणि 2.5 टीएमसी पाणी साठवण्याचे आश्वासन दिले होते. अर्थसंकल्पात इतर सिंचन प्रकल्पांसाठी निधीचे आकडे जाहीर करण्यात आले, परंतु नीरा-कऱ्हा प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी केवळ नावाचा उल्लेख केला. निधीचा पत्ता नसल्याने या भागातील जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
शेतकरी हितासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी
या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'या योजनेमुळे हजारो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमस्वरूपी सुटू शकतो. केवळ कागदावर घोषणा न ठेवता, सरकारने लवकरात लवकर निधीचे वाटप करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार आणि त्याचे नियोजन कसे असेल, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे.'