टीईटी घोटाळाप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तर ओरपींकडून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात येत आहेत. टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपी असलेल्या अश्विन कुमार याच्या घरातून २४ किलो चांदी, दोन किलो सोने आणि काही हिरे जप्त केले आहेत.
टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी अश्विन कुमार यांच्या बंगळुरूच्या घरी पुणे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी अश्विन कुमारकडून २४ किलो चांदी, दोन किलो सोने जप्त केले आहे. अश्विन कुमार हा जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख आहे.
टीईटी घोटाळाप्रकरणी आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्याकडून तीन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. तर दीड किलो सोन्याची दागिनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत ७३ लाख इतकी आहे. त्यामुळे सुपेंकडे घबाड नक्की किती? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरूच ठेवला आहे.