T20 World Cup 2026: भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2026 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली. या सुवर्णक्षणाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला खरा, पण दुर्दैवाने काही शहरांमध्ये या आनंदाला गालबोट लागले. हुल्लडबाजी, हाणामारी आणि आगीच्या घटनांमुळे विजयाचा हा सोहळा काही ठिकाणी तणावपूर्ण ठरला.
सांगली: मिरजेत लाठीमार, शहरात अग्नितांडव टळले
सांगलीतील मिरज परिसरात विजयाचा आनंद साजरा करताना काही तरुणांनी मर्यादेचे उल्लंघन केले. लक्ष्मी मार्केटमध्ये जमलेल्या अलोट गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना अखेर सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, सांगली शहरात फटाक्यांच्या ठिणगीमुळे एका दुकानाला आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
अकोला: फटाक्यांच्या वादातून भीषण दगडफेक
राज्यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती अकोल्यात पाहायला मिळाली. हरिहरपेठ भागात फटाके फोडण्यावरून दोन गट एकमेकांशी भिडले. या वादाचे रूपांतर दगडफेकीत होऊन वाहनांचे मोठे नुकसान झाले. या हिंसक घटनेत काही पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी झाले असून, सध्या परिसरात 'कोंबिंग ऑपरेशन' राबवून दोषींची धरपकड सुरू आहे.
पुणे: एफसी रोडवर पोलिसांचा बळाचा वापर
पुण्यातील तरुणाईचा हॉटस्पॉट असलेल्या फर्ग्युसन रोडवर (FC Road) मध्यरात्री तुफान गर्दी झाली होती. या गर्दीत हुल्लडबाजी वाढल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करत तरुणांना पांगवले.
अमरावती: जीवावर बेतणारा जल्लोष
अमरावतीच्या राजकमल चौकात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. येथे काही तरुणांनी उत्साहाच्या भरात एकमेकांच्या अंगावर फटाके फेकून जल्लोष साजरा केला. हा प्रकार धोकादायक असल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.
थोडक्यात इतर जिल्ह्यांची स्थिती
दरम्यान, धुळ्यात ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर शांततेत मिरवणुका काढण्यात आल्या. तसेच भंडाऱ्यात मुस्लिम लायब्ररी चौकात क्रिकेटप्रेमींनी फटाके फोडून भारतीय संघाचे अभिनंदन केले. एकूणच, टीम इंडियाने मैदान मारले असले तरी, विजयाचा हा जल्लोष साजरा करताना सामाजिक भान जपण्यात काही ठिकाणी अपयश आल्याचे दिसून आले.