डिसेंबरमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील टीम इडियाची घोषणा झाली आहे. 19 वर्षांखालील आशिया कपमध्ये आठ संघ सहभागी होणार असून ही स्पर्धा 12 ते 21 डिसेंबर दरम्यान दुबई येथे खेळवली जाणार आहे. यावेळी भारताला गट अ मध्ये स्थान देण्यात आले असून भारतासह पाकिस्तानचा देखील या गटात समावेश आहे. तर गट ब मध्ये बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आणखी एक पात्रता संघ असेल.
यादरम्यान भारतीय क्रिकेटमधील तरुण खेळाडू 17 वर्षीय आयुष म्हात्रेची कर्णधारपदी निवड झाली असून, विहान मल्होत्राची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचसोबत आशिया कप रायझिंग स्टारमध्ये आपली प्रतिभा दाखवणारा वैभव सूर्यवंशी देखील 19 वर्षांखालील आशिया कपमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या संघात यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडू, फिरकी गोलंदाज कनिष्क चौहान आणि हेनिल पटेल यांचा समावेश आहे.
शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयने 19 वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या तयारीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. आयुष म्हात्रेने या वर्षी जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले होते.
यावेळी पहिल्या सामन्यात टीम इंडिया दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर क्वालिफायर 1 शी सामना करेल. त्याच दिवशी द सेव्हन स्टेडियमवर क्वालिफायर 3 मध्ये पाकिस्तानचा सामना होईल. 14 डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना होईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
19 वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग, युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन ए पटेल, नमन पुष्पक, डी दीपेश, हेनिल पटेल, किशनसिंग जॉर्ज, किशन कुमार, जॉर्ज कुमार, युवराज गोहिल.
स्टँडबाय – राहुल कुमार, हेमचुडेसन जे, बीके किशोर, आदित्य रावत