Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरलं! मानसिक आधाराच्या नावाखाली शिक्षकानेच घेतला विद्यार्थिनीचा गैरफायदा

अहिल्यानगरच्या घारगावमध्ये शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरलं! मानसिक आधाराच्या नावाखाली शिक्षकानेच घेतला विद्यार्थिनीचा गैरफायदा

अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव परिसरात शिक्षकाच्या भूमिकेला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी असलेल्या एका शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही ग्रामीण भागातील खासगी माध्यमिक शाळेत आठवी इयत्तेत शिक्षण घेत आहे. घरातील परिस्थितीमुळे ती अनेकदा एकटी राहत असे. वडील कामानिमित्त बाहेरगावी, भाऊ कॉलेजमध्ये आणि आई घरकामात गुंतलेली असल्याने मुलगी मानसिकदृष्ट्या खचलेली होती. या एकटेपणाचा फायदा घेत आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (वय 23, ता. संगमनेर) याने तिच्याशी जवळीक वाढवली.

सुरुवातीला मैत्रीपूर्ण संवाद साधत त्याने तिचा विश्वास संपादन केला. भावनिक आधार देण्याच्या बहाण्याने तो तिच्या अधिक जवळ गेला. सातवीत शिक्षण घेत असतानापासूनच त्याने तिच्याशी संपर्क वाढवला होता. मोबाईलच्या माध्यमातूनही संवाद साधत तो तिच्या मनात स्थान निर्माण करत गेला. पुढे हीच जवळीक गंभीर गुन्ह्यात रूपांतरित झाल्याचा आरोप आहे.

फिर्यादीनुसार, डिसेंबर 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत मुलगी घरी एकटी असताना आरोपी तिच्या घरी जात असे. त्या वेळी तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार दीर्घकाळ गुप्त राहिला. मात्र काही दिवसांपूर्वी मुलीला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची मागणी आता जोर धरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number