“राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात. नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो” असा खळबळजनक आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यापाठोपाठ राज ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. त्यामुळे नाना पाटेकर-तनुश्री दत्ता वादाला आता नवं वळण मिळालं आहे.
आठ वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्यादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. ज्यावेळी आपण नाना पाटेकर यांच्याविरोधात बोललो, त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला करून आपली कार फोडली असाही आरोप तनुश्री दत्ताने केला आहे.
यासंदर्भातील एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. नाना पाटेकरांनी मला मनसे कार्यकर्त्यांना हाताशी धरून धमकावण्याचा प्रयत्न केला असेही तनुश्रीने म्हटले होते. आता मात्र तिने थेट राज ठाकरेंवरच आरोप केले आहेत.