मुंबई: आगामी T20 विश्वचषक 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असून अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. या निर्णयावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी थेट आयसीसीवरच नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “प्रत्येक मोठा सामना अहमदाबादलाच का? मुंबईसारख्या ऐतिहासिक क्रिकेट शहराला न्याय का मिळत नाही?” आयसीसीच्या वेळापत्रकानुसार, एक उपांत्य फेरी मुंबईत तर दुसरी कोलकाता किंवा श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवली जाणार आहे. मात्र अंतिम सामना पुन्हा एकदा अहमदाबादमध्येच खेळवला जाणार आहे. याआधीही एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना याच मैदानावर ठेवण्यात आला होता.
सोशल मीडियावर यावर व्यक्त होताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अहमदाबादला अंतिम सामन्यांचे केंद्र बनवण्यामागे खरं कारण काय आहे? क्रिकेटचा इतिहास असलेले मुंबईचे वानखेडे स्टेडियम किंवा कोलकात्याचे ईडन गार्डन्स अंतिम सामन्यासाठी का योग्य नाही? त्यांनी पुढे लिहिले की, आयसीसीने राजकीय दबावापासून दूर राहून निर्णय घ्यायला हवा. चेन्नईचे एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मोहालीचे आय.एस. बिंद्रा स्टेडियम ही सर्व मैदानं जागतिक दर्जाची असून, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अंतिम सामना त्यापैकी कुठेही खेळवणे योग्य ठरले असते.
So the T20 World Cup fixture is out. Guess where the Final is scheduled?
Ahmedabad. What’s this fascination of pulling every single final there? Has this been a traditional cricket venue? Why not Mumbai? Wankhede will be the absolute best venue for a T20 World Cup final.… pic.twitter.com/thezl9QIz0 — Aaditya Thackeray (@AUThackeray) November 25, 2025
विश्वचषक 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान
हा T20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे एकत्रितपणे खेळवला जाणार आहे. भारत – पाकिस्तान यांच्यातील चुरशीचा सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होईल. अ गटात भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया या संघांचा समावेश आहे.
अंतिम सामना अहमदाबादला घेण्यामागील कारणांविषयी आयसीसीकडून अद्याप कोणती अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र आदित्य ठाकरे यांच्या टीकेनंतर या निर्णयावरून नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.