यवतमाळ जिल्ह्यात राळेगावच्या जंगलात असलेली टी-वन ही नरभक्षक वाघीण वनविभागाच्या शोध पथकाला पुन्हा एकदा दिसली आहे. कक्ष क्रमांक 652 मध्ये टी-वन शोध पथकापुढे आली. या जंगलात दीड महिन्यापासून नरभक्षक वाघीण व तिच्या दोन बछड्यांना शोधण्यासाठी मिशन टी-वन कॅप्चर राबविण्यात येत आहे.
वाघांचा अधिवास असलेल्या या जंगलात वन विभागाने हत्ती सोडले, शिकारी कुत्र्यांकडून शोध घेतला, पॅरा ग्लाईडर व ड्रोन कॅमेरयांनी हवेतून टेहळणी केली, जंगलात ठिकठिकाणी वाघिणीसाठी सावज बांधले, शूटर नवाब शाफत अली खान देखील तिच्या मागावर आहेच परंतु या सगळ्या उपायांना वाघीण हुलकावणी देत आहे.
आता या जंगलात नागपूर येथील महाराज बागेतील अन्य वाघिणीचे मूत्र शिंपडण्यात आले आहे. त्याच्या गंधाने नरभक्षक वाघीण बाहेर आली असे वन विभागाने सांगितले असले तरी तिला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न यशस्वी का होऊ शकले नाही याचे उत्तर देण्यास वन विभाग टाळाटाळ करीत आहे.