महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्यातील इयत्ता २ री, ३ री, ४ थी आणि ६ वीसाठी नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली असून जून २०२६ पासून विद्यार्थ्यांना नव्या पाठ्यपुस्तकांद्वारे शिक्षण दिले जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) आणि बालभारती यांच्या माध्यमातून हा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत, कौशल्याधारित आणि परिणामाभिमुख शिक्षण पद्धतीनुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता २ री, ३ री आणि ४ थीच्या अभ्यासक्रम आराखड्यानंतर इयत्ता ६ वीच्या अभ्यासक्रमालाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जून २०२६ पासून नवीन शैक्षणिक सत्रात या चार वर्गांमध्ये सुधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे.
नवीन पाठ्यपुस्तकांची छपाई सुरू झाली असून ती शाळांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी बालभारतीकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. नव्या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांची विचारशक्ती, आकलन क्षमता आणि प्रत्यक्ष जीवनातील कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच चित्रमय मांडणी, कृतीआधारित शिक्षण, उदाहरणे आणि सराव प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्य सरकारने यापूर्वीच इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू केला होता. त्यानंतर आता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या वर्गांमध्ये बदल करण्यात येत आहेत. पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने इतर वर्गांसाठीही नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि कौशल्याधारित शिक्षण मिळण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.