येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती असून त्यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रातून पायउतार झाले आहेत. तर १८ फेब्रुवारी रोजी नवे राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी होणार आहे. म्हणजेच १९ फेब्रुवारीपूर्वीच नवे राज्यपाल रमेश बैस यांचा महाराष्टाचे राज्यपाल म्हणून शपथविधी होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा रविवारी अखेर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. त्यांच्या जागी आता रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी झाला. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. १९८० ते १९८४ या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले आहेत.१९८२ ते १९८८ या काळात रमेश बैस यांनी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले. १९८९ मध्ये रमेश बैस पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले, जिथे रमेश बैस यांनी विजय मिळवला आणि संसदेत आपले स्थान निर्माण केले. छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर रमेश बैस हे रायपूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. तेव्हापासून ते २०१९ पर्यंत रायपूरचे प्रतिनिधित्व करत राहिले.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. ते लोकसभेतील भाजपचे चीफ व्हिपही होते. २०१९ मध्ये, भाजपने ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आधारावर लोकसभेचे तिकीट दिले नाही, परंतु त्यांच्या वचनबद्धतेमुळे त्यांना जुलै २०१९ मध्ये त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले होते. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांनी त्रिपुराचंही राज्यपालपद भूषवले आहे.