छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणायचे की धर्मवीर यावरून राज्यात वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात पुन्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असे बॅनर लावण्यात आले आहेत. संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. यातून राष्ट्रवादीनं भाजपला डिवचल्याचं मानले जात आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात भाषण करताना संभाजी महाराजांना धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक म्हणावे, अशी सूचना केली होती. त्यावरून भारतीय जनता पक्षाने पवार यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन केले होते. त्यानंतरही अजित पवार आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. पुण्यात राष्ट्र्रवादीकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते.
दरम्यान, संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळा दिनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे शहरात पुन्हा बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असा उल्लेख आहे. पुण्यातील डेक्कन चौकात असलेल्या संभाजी महाराज पुतळ्याजवळ ही बॅनरबाजी केलेली आहे.