पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे निकटचे सहकारी चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री उशिरा निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कोलकाताजवळील मध्यमग्राम परिसरात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीला घेरून गोळीबार केला. हा हल्ला करण्यासाठी आठ हल्लेखोर चार मोटरसायकलवरून आले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राममधील दोहारिया परिसरात ही घटना घडली आहे. चंद्रनाथ रथ हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून सहकाऱ्यांसह जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली आणि काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला.
पोलिसांच्या आणि प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला पूर्वनियोजित होता. चंद्रनाथ रथ बुधवारी रात्री उशिरा कोलकाताहून उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील दोहरिया (जेस्सोर रोड) येथील आपल्या फ्लॅटवर परत येत होते. अशाप्रकारे हा हल्ला करण्यात आला.
बनावट नंबर प्लेट असलेली कार
चंद्रनाथ यांची स्कॉर्पिओ त्यांच्या घरापासून फक्त 200 मीटर अंतरावर असताना, सिलिगुरी नोंदणी (WB 74) असलेल्या एका कारने त्यांचा रस्ता अडवला. पश्चिम बंगालचे डीजीपी सिद्धार्थ नाथ गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की त्या कारला बनावट नंबर प्लेट होती.
पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सिद्धनाथ गुप्ता यांनी सांगितले की, मध्यग्रामजवळील घटनास्थळावरून जिवंत काडतुसे तसेच रिकामी काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुप्ता म्हणाले, "आम्ही तपास सुरू केला आहे. गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली आहे, परंतु तिची नंबर प्लेट बनावट आणि छेडछाड केलेली असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही घटनास्थळावरून जिवंत आणि रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात असून पुराव्यांची तपासणी केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे."