वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बॉलिवूडचा हॅन्डसम हंक हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. हृतिकला बर्थ डे निमित्त त्याची घटस्फोटीत पत्नी सुझान खानने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुभेच्छा दिल्या आहेत. सुझानने इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर करुन, हृतिकला बर्थ डे विश केले आहे. “माझ्या आयुष्यात तू नेहमीच सूर्यकिरणांसारखा राहशील. नेहमी आनंदी राहा आणि तुझं तेज पसरत राहो” असं सुझानने म्हटलं आहे.

सुझानने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी खूप लाईक केले आहे. हृतिकने त्याचा पहिला सिनेमा ‘कहो ना प्यार है’च्या यशानंतर वर्ष 2000 मध्ये सुझानसोबत लगीनगाठ बांधली होती. मात्र, काही काळानंतर त्या दोघांमध्ये मतभेत सुरु झाले. आणि हृतिक आणि सुझान यांनी 2014 मध्ये आपल्या 14 वर्षांच्या संसाराचा काडीमोड घेतला. या दोघांना दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा रेहान 11 वर्षांचा तर लहान मुलगा रिदान 9 वर्षांचा आहे.
हृतिक आणि सुझान यांनी मुलांसाठी अनेकवेळा घटस्फोटानंतरही एकत्र वेळ घालवला आहे. मुलांसोबत दोघेही अनेकवेळा सुट्टीनिमित्त देशाबाहेर फिरायला गेल्याचं अनेकदा दिसले. तर, आज वाढदिवसानिमित्त सुझानने हृतिकला खास शुभेच्छा दिल्या आहेत.