नाशिक : नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय श्रावणी पाटील या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात टीटी प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात लसीकरणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे, मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
श्रावणी पाटील हिने टीटी प्रतिबंधक लस घेतली होती. लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. लसीकरणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रशासन सत्य लपवत असल्याचा आरोप मृत मुलीचे मामा यांनी केला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. चौकशीसाठी विशेष वैद्यकीय पथक नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यभर लसीकरण मोहीम राबवणाऱ्या विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. दहा लाख लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला लसीनंतर गंभीर रिअॅक्शन येऊ शकते, असा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक कपिल आहेर यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संपूर्ण लसीकरण मोहीम देखील थांबवण्यात आली आहे.