मुंबई: मुंबईतील रे रोड परिसरात मोहर्रमच्या अशुरा मिरवणुकीदरम्यान एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रेहमताबाद कब्रस्तानाजवळ काही व्यक्ती मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना संशयास्पद कॅप्सूल वाटत असल्याची घटना समोर आली आहे. या कॅप्सूलचे सेवन केल्यानंतर काही नागरिकांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहर्रमच्या मिरवणुकीदरम्यान चार जण नागरिकांना एकत्र करून त्यांना काही कॅप्सूल देत होते. सुरुवातीला अनेकांनी या कॅप्सूलचा स्वीकार केला. मात्र, मिरवणुकीत सहभागी असलेल्या एका जागरूक महिलेला हा प्रकार संशयास्पद वाटला. संबंधित व्यक्तींना याबाबत विचारणा केली असता त्यांनी या कॅप्सूल आरोग्यवर्धक असून त्या ‘इम्युनिटी बूस्टर’ असल्याचे सांगितले.
तथापि, महिलेला त्यांच्या उत्तरावर समाधान झाले नाही. तिने स्वतः एक कॅप्सूल उघडून पाहिली. त्यावेळी कॅप्सूलच्या आत काळ्या रंगाची अज्ञात पावडर असल्याचे तिच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच तिने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली.
महिलेकडून माहिती मिळताच भायखळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे पथक पोहोचताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याचे अन्य तीन साथीदार फरार झाल्याचे सांगितले जात आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात संशयास्पद कॅप्सूल जप्त केल्या आहेत. या कॅप्सूलमधील पावडर नेमकी कोणती आहे, याचा तपास सुरू असून नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपास अहवाल आल्यानंतरच या पदार्थाचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार पोलिसांच्या कारवाईपूर्वी अनेक नागरिकांनी या कॅप्सूलचे सेवन केले होते. त्यापैकी काहींना अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी धार्मिक कार्यक्रमांदरम्यान अनोळखी व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा औषध स्वीकारताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.