मुंबई, २२ जून २०२३, प्रतिनिधी : गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला. अशातच आत महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी देखील राजकारणात प्रवेश केला. आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वेगळे वळण आले आहे. अलीकडेच सुरेखा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत वेगळ्या पक्षात प्रवेश केलाय.
महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी हैद्राबादच्या बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीत या पक्षात प्रवेश केलाय. २१ जून रोजी तेलंगणाचे मुख्ममंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. या कार्यक्रमासाठी सुरेखा पुणेकर दोन दिवसांआधीच हैद्राबादमधील डेरे येथे दाखल झाल्या होत्या.
काही दिवसापुर्वी सुरेखा आणि प्रविण दरेकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यावेळी सुरेख पुणेकर यांनी दरेकरांना चांगलेच सुनावले होते. “घाण तोंडाचे प्रवीण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात कसे काय,” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. सुरेखा यांना विधानसभा निवडणूका लढवायची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात त्या मोहोळ किंवा देगूलूरमधून BRS च्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.