मुंबई : नुकतीच शरद पवार यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात शरद पवार एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता या सर्व चर्चेवर सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या की, ‘आमच्याशी कोणी बोलत नाहीये, आम्ही कुणाशी बोलत नाहीये. भाजपसोबत जाण्याचा विषयच आमच्या चर्चेत नाही. वर्तमानपत्र आणि टीव्हीवरच या बातम्या सुरू आहेत. संजय राऊतांचा गैरसमज झाला आहे. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट कॅज्युअल होती’, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यात गेल्या शुक्रवारी पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याची बातमी समोर आली. या घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना हवा मिळाली. राष्ट्रवादीतील पाच ते सहा खासदार अस्वस्थ असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. तर काल संजय राऊतांनी शिंदे-पवार भेटीवर जाहीर नाराजी व्यक्त केली.
त्यांनी पुढे नमूद केले की, ‘शरद पवार यांनी मला अनेक वर्षांपूर्वी मला एक गोष्ट सांगितली होती. चांगलं किंवा वाईट आपली चर्चा होतेय, याचा अर्थ आपलं नाणं अजून खणखणीत आहे, असा विचार करून आम्ही पुढे जातो. मोदींचे सरकार आले त्याला 12 वर्षे होतील. गेल्या 12 वर्षांपासून माझ्या जाण्याची चर्चा सुरु आहे. आम्ही सर्व खासदार नियमित संपर्कात आहोत. एकमेकांना भेटतो आणि विविध विषयांवर चर्चा करतो’, असं त्यांनी म्हटलं आहे.