जय महाराष्ट्र न्यूज, महाड
रायगडमध्ये जादूटोणा करण्याच्या बहाण्याने मांत्रिकाकडून एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीयं. पीडित महिलेच्या पतीवर असलेले कर्ज फिटत नसल्यानं ती मंडणगड तालुक्यातल्या विणे गावातल्या एका मांत्रिकाकडे गेली. गोविंद कोंडाळकर असं या मांत्रिकाचं नाव आहे. घरात तांत्रिक विधी करावे लागतील, तसंच त्यावेळी घरी पती नको असं सांगत तो मांत्रिक महिलेच्या घरी गेला. त्यानंतर या मांत्रिकाने महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी या मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे पुण्यात देखील अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या अंगातील भूत काढण्याच्या बहाण्यानं भोंदूबाबानं मुलीकडे शरीरसंबंधांची मागणी केली. राजू साळवे असं या आरोपी भोंदूबाबाचं नाव आहे. राजू साळवे हा इलेक्ट्रिशियनचं काम करत होता. संबंधित महिलेच्या घरी लाईटींगचे काम करण्यासाठी गेला असताना, महिला आजारी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने महिलेला भूतानं झपाटल्याचं तिच्या कुटुंबियांना सांगितलं. तिच्या 23 वर्षीय मुलीला देवासोबत लग्न करावं लागणार तेव्हाच आईच्या अंगातून भूत निघेल असं त्याने सांगितलं. मात्र याचाच फायदा घेत तो मुलीकडे शारिरीक संबंधाची मागणी करू लागला. त्यानंतर पोलिसांत याविषयी तक्रार दाखल करण्यात आली.