कोरोना काळानंतर अखेर राज्यात शाळेची घंटा वाजली. मात्र, त्यानंतर यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार का? याबाबत विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम होता. मात्र, आता विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, २ मेपासून विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी सुरू होणार असून १२ जूनपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, तीव्र उन्हामुळे विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार असल्याचे आदेश शिक्षण विभागाच्या संचालकांनी दिले आहेत.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आले. मात्र, आता प्रत्यक्षरित्या शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी-पालकवर्गामध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
दरम्यान, शाळांमध्ये विदयार्थ्यांना मास्कसक्ती कायम असेल अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.