मुंबई, ५ मे २०२३, प्रतिनिधी : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन झाले. वयाच्या ९४ वर्षी सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुलोचना दीदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सोज्वळ, निरागस अभिनयातून कोट्यवधी चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे रविवारी मुंबईतील शुश्रूषा रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले.
सुलोचना दीदी यांची शनिवारी प्रकृती चिंताजनक बनली होती. रात्री उशिरा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याआधी त्यांना ऑक्सिजन दिला जात होता. मार्च महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा श्वास घेण्यात अडचण येत होती. ३ आठवडे उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली होती.
सुलोचना दीदी यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपटातून काम केलं. यामध्ये त्या प्रमुख अभिनेत्रीसह सहाय्यक अभिनेत्री म्हणून कार्यरत होत्या. ४० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी पाऊल टाकलं होतं. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं. मराठी मातीतील शालीनता, घरंदाज अभिनय आणि सोज्वळतेचा चेहरा म्हणजे सुलोचना दीदी होया. सुलोचना दीदींचं मूळ नाव सुलोचना लाटकर. कोल्हापूरमधल्या खडकलाट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला. २५० हून अधिक मराठी आणि १५० हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.
अभिनयातली वात्सल्यमूर्ती हरपली
सुलोचना दीदींचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. बेळगावच्या चिकोडी तालुक्यातील खडकलरत गावी त्यांचा जन्म झाला. चित्रपटसृष्टीत १९४३ मध्ये त्यांनी पदार्पण केले. भालजी पेंढारकर यांचं त्यांना मार्गदर्शन लाभले. मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. चरित्र अभिनेत्री म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. विशेषत: त्यांनी केलेल्या ‘आई’च्या भूमिका संस्मरणीय आहेत.
अभिनयाची कारकीर्द
पद्मश्री, महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं त्यांना गौरवित्त करण्यात आले. फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानीत करण्यात आले. त्यांनी सुमारे ४०० हिंदी, मराठी सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘चिमुकला संसार’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. ‘वहिनीच्या बांगड्या’ सिनेमानं त्यांना खरी ओळख दिली. प्रपंच, मराठा तितुका मेळावावा, एकटी, मोलकरीण, सासुरवास हे त्यांचे गाजलेले मराठी सिनेमे. सुजाता, जॉनी मेरा नाम, कोरा कागज, कटी पतंग, रेश्मा और शेरा हे त्यांचे गाजलेले हिंदी सिनेमे. अमिताभ यांच्यासोबत ‘मजबूर’ सिनेमात त्यांनी भूमिका साकारली.