उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुषाभ देसाईंचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाईंनी पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी सुभाष देसाई आमच्या सोबतच असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, सुभाष देसाई आमच्यासोबत असून भूषण देसाई यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. पण, त्यांना वॉशिंगमशीनमध्ये उडी मारायची असेल तर जाऊ शकतात, असे ते म्हणाले. सुभाष देसाई हे दररोज उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत असतात. त्यांना पद, मंत्रीपद नसलं तरीही ते 24 तास पक्षासाठी झटत असतात. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करत आहोत, असेही ते म्हणाले.
पक्षप्रवेशादरम्यान, बाळासाहेब हेच माझे दैवत असल्याचे भूषण देसाई म्हटले. ते म्हणाले, राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. मी मुख्यमंत्री शिंदेंचे काम पाहिले आहे. शिंदे यांच्या कामाची पद्धतही माहित आहे. त्यामुळे त्यांच्यासबोत काम करण्याचा निर्णय घेतला असून शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे भूषण देसाई म्हणाले. तसेच, पक्षप्रवेश करणार असल्याचे माझे वडील आणि उद्धव गटाचे नेते सुभाष देसाई यांना कल्पना दिली असल्याचेही ते म्हणाले.