कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. दरम्यान, हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. पुढील निकाल येईपर्यंत महाविद्यालयाील विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख घालू नये, असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत.
हिजाब प्रकरणामुळे कर्नाटकात वातावरण तापले आहे. त्यामुळे कर्नाटकातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुढील महिन्यात विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी, शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू कराव्यात. मात्र पुढील निकालापर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख परिधान करू नये. तसेच राज्यात शांतता राखण्याचे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत.
कर्नाटकमधील चार विद्यार्थ्यींनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्याच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानुसार कर्नाटक न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती रितु राज अवस्थी, न्यायमूर्ती जस्टिस कृष्णा एस दीक्षित आणि जेएम खाजी यांच्या पूर्ण खंडपीठासमोर हिजाब प्रकरणी सुनावणी पार पडली.
कर्नाटकमधील हिजाब प्रकरण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पोहचले. ९ न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे हिजाब प्रकरणी सुनावणी घ्यावी, अशी मागणी वकील कपिल सिब्बल यांनी कोली होती. त्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या सुनावणीनंतर याप्रकरणी निर्णय घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.