छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील एका शाळेत गुरुवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूप काही वेळातच हिंसक घटनेत बदलले. एका अल्पवयीन विद्यार्थ्याने संतापाच्या भरात पॉकेट चाकू काढून आपल्या वर्गातील चार विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील मधल्या सुट्टीदरम्यान विद्यार्थी हात धुण्यासाठी रांगेत उभे होते. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमुळे दोन विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. उपस्थितांनी हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित विद्यार्थी संतापून तेथून निघून गेला. काही वेळाने तो पॉकेट चाकू घेऊन परत आला आणि वर्गातच आपल्या सहाध्यायांवर हल्ला केला.
घटना इतक्या वेगाने घडली की इतर विद्यार्थ्यांना काही समजण्याआधीच चार जण जखमी झाले. हल्ल्यानंतर वर्गात एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी घाबरून वर्गाबाहेर धावू लागले, तर शिक्षकांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांच्या हाताला, एका विद्यार्थ्याच्या पायाला आणि एका विद्यार्थ्याच्या पाठीवर दुखापत झाली आहे. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती लक्षात घेऊन त्याला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) हलविण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित अधिकारी शाळेत दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून शिक्षक, विद्यार्थी आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती घेतली. या प्रकरणात संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्याबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून घटनेमागील नेमके कारण तपासले जात आहे.