Tourism Ban In Thane: महाराष्ट्रभर सुरू असलेल्या पावसाच्या तांडवामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती गंभीर बनली असून दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. मुंबई आणि पुण्याच्या रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले असतानाच, हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी (MMR) अतिवृष्टीचा नवा इशारा दिला आहे. या काळात ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने चक्रीवादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे जिल्हा प्रशासनाने तातडीने एक मोठा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
ठाणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'; सखल भागात साचले पाणी
ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' दिला असून, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे ठाण्यातील सखल भागांना तलावाचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोलमडल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. नागरिकांची गैरसोय आणि अपघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा तातडीचा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.
जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक पाऊल
ठाणे जिल्ह्यातील धरणे, तलाव, नदीकाठ आणि धबधब्यांच्या परिसरात पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. मात्र, अतिवृष्टीच्या काळात धबधब्यांच्या ठिकाणी दरडी कोसळणे, पाण्याचा वेग वाढून पर्यटक वाहून जाणे किंवा बुडणे, आणि गड-किल्ल्यांवरील पायवाटा निसरड्या होऊन मोठे अपघात होण्याचा धोका वाढतो. पूर्वी घडलेल्या अशा जीवघेण्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हवामान विभागाचा इशारा संपत नाही तोपर्यंत ही सर्व पर्यटन स्थळे 'नो-एन्ट्री' झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.