सातारा : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा बनावट खत आणि कीटकनाशकांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. खटाव तालुक्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 30 लाख 60 हजार रुपयांचा संशयित बनावट खत आणि कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कारवाईनंतरही हा व्यवसाय पुन्हा सुरू कसा झाला? यामागे कोणाचे पाठबळ आहे का?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा सध्या समोर आलेला नाही. त्यामुळे त्याबाबत तपासातूनच सत्य स्पष्ट होईल.
वडूजमधील पेडगाव रोड परिसरातील एका पत्र्याच्या शेडवर टाकलेल्या छाप्यात जवळपास 99 हजार 450 किलो संशयित बनावट दाणेदार खत, नामांकित कंपन्यांच्या बनावट गोण्या, लेबल्स, बनावट कीटकनाशके तसेच पॅकिंगसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. याप्रकरणी दिलीप सीताराम काळे आणि प्रतिक दिलीप काळे यांच्याविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, रासायनिक खते नियंत्रण आदेश, कीटकनाशक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर आता तपास यंत्रणांसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे हे बनावट खत नेमके कुठून आणले जात होते. कोणत्या भागात विकले जात होते आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे?, तसेच याच ठिकाणी पूर्वीही कारवाई होऊनही हा प्रकार पुन्हा सुरू होणे ही बाब गंभीर मानली जात असून, या संपूर्ण साखळीचा तपास आता पोलीस आणि कृषी विभाग करत आहेत.