गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटी महामंडळ राज्यशासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. गेल्या १०० दिवसांहून अधिक दिवस एसटी संपामुळे एसटी बससेवा बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असून एसटी संपातले नुकसान कामगारांकडून वसूल करणार नाही, असा खुलासा एसटी महामंडळाने केला आहे.
एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्ट केले आहे.
आज उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. यावर आज सुनावणी पार पडली. मात्र, एसटी विलिनीकरणाच्या अहवालाबाबत सुनावणी पुढे ढकलली असून पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.