ST Bus Fare Hike: प्रवाशांना मोठा धक्का!एसटी प्रवास महागण्याची चिन्हे; आता तिकीटासाठी किती जास्त पैसे मोजावे लागणार?

या प्रस्तावावर आज राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (STA) बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असून, मंजुरी मिळाल्यास नवीन तिकीट दर तातडीने लागू होऊ शकतात.

ST Bus Fare Hike: प्रवाशांना मोठा धक्का!एसटी प्रवास महागण्याची चिन्हे; आता तिकीटासाठी किती जास्त पैसे मोजावे लागणार?

एसटीच्या तिकीट दरात कपात होईल, अशी अपेक्षा करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उन्हाळी हंगामासाठी लागू करण्यात आलेली अतिरिक्त भाडेवाढ संपत असतानाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) 13.50 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर आज राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (STA) बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असून, मंजुरी मिळाल्यास नवीन तिकीट दर तातडीने लागू होऊ शकतात.तिकीट दर निश्चित करण्याच्या पद्धतीतही बदल सुचवण्यात आला आहे. बसमध्ये सुट्ट्या पैशांवरून वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी यापुढे तिकीटांचे दर पाच रुपयांच्या पटीत ठेवण्याचा विचार आहे. यापूर्वी एक रुपयांच्या पटीत दर निश्चित केल्यामुळे वाहक आणि प्रवाशांना सुट्ट्या पैशांच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.

राज्यात 15 एप्रिलपासून 10 टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली होती. ही मुदत 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ही मुदत संपत असतानाच विद्यमान 10 टक्के वाढ कायम ठेवून त्यात आणखी 3.50 टक्क्यांची वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण भाडेवाढ 13.50 टक्क्यांवर जाणार आहे. गर्दीच्या काळात 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला असल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वाढत्या खर्चामुळे हा निर्णय आवश्यक ठरत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि विविध भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे डिझेलच्या दरात वाढ झाली असून बससाठी लागणारे टायर, सुटे भाग आणि देखभाल खर्चही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.राज्य सरकारने एसटी महामंडळाला पगार, प्रशासकीय खर्च आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या स्वतःच्या उत्पन्नातून पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी भाडेवाढ हा प्रमुख पर्याय असल्याचे महामंडळाचे मत आहे.

मात्र, भाडेवाढ करूनही आर्थिक परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. मे महिन्यात हंगामी वाढीव दर लागू असतानाही महामंडळाला 1,047.17 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर खर्च 1,096.07 कोटी रुपयांवर पोहोचला. परिणामी, त्या महिन्यातही महामंडळाला तोटा सहन करावा लागला. राज्यातील 31 विभागांपैकी 22 विभागांना स्वतःचा खर्चही भागवता येत नसल्याचे समोर आले आहे.आज होणाऱ्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीतील निर्णयानंतर एसटीच्या तिकीट दराबाबतचे चित्र स्पष्ट होणार असून, लाखो प्रवाशांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number