बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-चिखली मार्गावर गणेशपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवासी वाहनाला मागून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका मोठा होता की प्रवासी वाहन रस्त्याच्या खाली जाऊन उलटले. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना प्रथम खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर नंदाबाई साबळे आणि रेणुका लढाड या दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गोंदियातही एसटीला चारचाकीची धडक
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा बसस्थानकासमोरही एसटी बसचा अपघात झाला. तुमसर आगाराची बस बालाघाटवरून गोंदिया-तिरोडा मार्गे तुमसरकडे जात असताना बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी वळत होती. त्याचवेळी सर्व्हिस रोडवरून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने बसला जोरदार धडक दिली.या अपघातात बसचे चालक, वाहक आणि बसमधील 14 प्रवासी सुदैवाने सुखरूप बचावले. मात्र, बस आणि चारचाकी वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोन्ही वाहनं बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे एसटी प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.