जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आपल्या लाडक्या अभिनेत्रीला शेवटचं पाहाता याव म्हणून गेल्या तीन दिवसांपासून श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची वाढती गर्दी पाहायला मिळतेय. अहमदाबाद, नाशिकहून श्रीदेवी यांचे चाहते त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. श्रीदेवींचा अखेरचा निरोप घेण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. श्रीदेवींच्या निवासस्थानी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्पोर्ट्स क्लबमध्ये होणारी गर्दी पाहता सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे.
सेलिब्रेटींमधील अरबाज खान, फराह खान, उर्वशी रौतेला, तब्बू, अक्षय खन्ना, हेमा मालिनी, ईशा देओल, सोनम कपूरसह तिचा प्रियकर आनंद अहुजासुद्धा अंत्य दर्शनासाठी पोहोचले. कपूर परिवारातील संजय कपूर, रेखा कपूर, हर्षवर्धन कपूर सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय ऐश्वर्या राय-बच्चन, सुश्मिता सेन, जया बच्चन, रेखा, सरोज खान, माधुरी दिक्षित, जाकलिन फर्नांडिस, अजय देवगण सह काजल या स्पोर्ट क्लब मध्ये दाखल झालेत.
अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं. रात्री पासूनच सेलिब्रेटींनी येण्यास सुरवात केली होती. अभिनेता सलमान खान, राजपाल यादव, पुनम धिल्लो आणि इतरांनी रात्रीचं निवासस्थानी दर्शन घेतले. विशेषत: रात्रीची वेळ असून देखील श्रीदेवींच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
अहमदाबाद, नाशिक, राजस्थान अशा अनेक ठिकाणाहून चाहते आले आहेत. इतकेच नव्हे तर ‘आय मिस यु श्रीदेवी’अशा प्रकारचे पोस्टर घेऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली. श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन चाहत्यांना घेता यावे म्हणून सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब, गेट क्रं. 5, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे सकाळी साडेनऊ ते साडेबाराच्या दरम्यान ठेवण्यात येणार आहे.