मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मंत्रिमंडळ आणि आमदार, खासदारांवर अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. शिवसेनेकडून या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अयोध्या दौऱ्याची वातावरण निर्मिती करण्यात शिंदे चांगलेच यशस्वी ठरले आहेत. याचवेळी विरोधकांकडून शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र, याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम मंदिराला २ तोळ्यांचा धनुष्यबाण भेट दिला आहे.
एकनाथ शिंदे हे शनिवारीच अयोध्या दौऱ्यात दाखल झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सकाळी अयोध्येत दाखल झाले. यावेळी शिंदे यांचं अयोध्येत जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. यानंतर अयोध्येतील रामसेतू पार्क येथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदयात्रेला सुरूवात झाली. रामसेतू पार्क ते राम मंदिर अशी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.
यानंतर रामजन्मभूमी अयोध्या नगरीतील रामलल्लाच्या मंदिरात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामचंद्राचे मनोभावे दर्शन घेतलं. त्यानंतर मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने प्रभू श्रीरामाची महाआरती संपन्न झाली. यावेळी ‘जय श्रीराम’च्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर निनादून गेला. यावेळी शिवसेना व भाजप पक्षातील मंत्री, खासदार आमदार यांच्यासह मोठ्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी राम मंदिराला दोन तोळ्याचा सोन्याचा धनुष्यबाण भेट म्हणून दिला.