मुंबई , ३० जुलै २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याचा आज 47 वा वाढदिवस. सोनूने आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या खलनायकाच्या भूमिका तर बरीच गाजल्या पण अभिनयासोबत सोनू सूदने समाज कार्याने देखील लोकांची मने जिंकली.
जाणून घेऊया सोनू बद्दल
सोनू सूदला समाजसेवेची प्रचंड आवड आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला सोनू इंजिनिअर व्हावा, अशी त्याच्या घरच्यांची इच्छा होती. आई-वडिलांच्या इच्छेचा मान ठेवत अभिनेत्याने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर खिशात फक्त 5500 रुपये घेऊन सोनूने मुंबई गाठली आणि खऱ्या अर्थाने त्याच्या संघर्षमय प्रवासाला सुरुवात झाली.
सोनू सूदचा पहिला सिनेमा
सोनू सूदने १९९६ मध्ये ‘मिस्टर इंडिया’ या स्पर्धेत भाग घेतला होता. पण या स्पर्धेत त्याला यश मिळालं नाही. त्यानंतर सलग तीन वर्ष तो संघर्ष करत राहिला. त्यानंतर एका दाक्षिणात्य सिनेमाने त्याला ब्रेक मिळाला. १९९९ साली ‘कालाझगर’ या सिनेमाच्या माध्यमातून सोनूने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर २०२२ मध्ये तो ‘शहीद ए आजम’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आला.
सोनू सूदने कधी नायक तर कधी खलनायक म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सोनूने पंजाबी, कन्नड, तामिळ, तेलुगू अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेमांमध्ये काम केलं आहे. कोरोनाकाळात सोनूने अनेकांना मदत केली आहे. सोनू सूद नेहमीच समाज माध्यमांवर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.