Sonali Bendre: मावळमधील 30 गुंठे जागेवरून अभिनेत्री सोनाली बेंद्रे गोत्यात; स्थानिक शेतकऱ्याची थेट न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय आहे?

सोनाली बेंद्रे आणि तिच्या पतीवर मावळमधील जमिनीवरून शेतकऱ्याने कुळ हक्क डावलल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे.

Sonali Bendre: मावळमधील 30 गुंठे जागेवरून अभिनेत्री सोनाली बेंद्रे गोत्यात; स्थानिक शेतकऱ्याची थेट न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय आहे?

पुणे: सिल्व्हर स्क्रीनवरील झगमगाट आणि वास्तवातील जमिनीचे वाद यांचा तसा जुनाच संबंध आहे. आता याच वादाच्या भोवऱ्यात नव्याने अडकले आहेत ते बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बेहल. निसर्गरम्य मावळ तालुक्यातील एका जमिनीच्या तुकड्यावरून हा वाद उफाळून आला असून, थेट न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. 'कुळ हक्क' आणि 'हायप्रोफाईल व्यवहार' यांच्यातील या संघर्षाने सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचे केंद्रबिंदू आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वसलेले उकसान गाव. येथील स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांनी न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार, उकसान येथील 30 गुंठे जमिनीवर सन 1957 पूर्वीपासून त्यांच्या कुटुंबाचा 'कुळ हक्क' अबाधित आहे. मात्र, हा कायदेशीर हक्क जाणीवपूर्वक डावलून अत्यंत बेकायदेशीरपणे आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे या जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात केला आहे.

केवळ बेकायदेशीर खरेदी-विक्रीवरच हा वाद थांबलेला नाही, तर या प्रकरणाला एक गडद किनारही आहे. फिर्यादी शिंदे यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित वादग्रस्त जागेवर बळजबरीने अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतकेच नव्हे तर, याला विरोध दर्शवल्यास कुटुंबीयांना दमदाटी आणि धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला आहे. सर्वसामान्यांचा आवाज दाबून जमिनी लाटण्याच्या या कथित प्रकारामुळे स्थानिक पातळीवर मोठी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: Donald Trump : 'आता ते मला राजा म्हणतात', ट्रम्प यांची स्वतःवरच स्तुतीसुमने; व्हायरल भाषणात उडवली मॅक्रॉन यांची खिल्ली

हा वाद आता थेट न्यायदेवतेच्या दरबारात पोहोचला आहे. प्रकरणाचे स्वरूप दिवाणी असल्याने फिर्यादीने पोलिसांऐवजी थेट वडगाव मावळ न्यायालयात दाद मागणे पसंत केले आहे. वादग्रस्त जमिनीवर सध्या कोणतेही नवे बांधकाम होऊ नये किंवा त्याबाबत कोणताही व्यवहार होऊ नये, यासाठी न्यायालयाकडे 'मनाई आदेश' लागू करण्याची जोरदार मागणी शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे. या बहुचर्चित प्रकरणाची पुढील महत्त्वपूर्ण सुनावणी 20 एप्रिल 2026 रोजी होणार असून, न्यायालय यावर कोणता निर्णय देते, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

वादाच्या मुद्द्याला  नेहमी दोन बाजू असतात, तसेच या प्रकरणातही घडले आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रेचे वकील राजू शिंदे यांनी शेतकऱ्याने केलेले सर्व आरोप अत्यंत स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. "हे सर्व आरोप पूर्णतः तथ्यहीन असून, केवळ स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि प्रतिष्ठित व्यक्तींकडून पैसे उकळण्याच्या हेतूने हा बनाव रचण्यात आला आहे," असा प्रतिदावा बेंद्रेच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे हा खटला म्हणजे केवळ ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे की खरोखरच एका सामान्य शेतकऱ्याच्या हक्काची पायमल्ली? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.

एकीकडे पिढ्यानपिढ्या जमिनीशी जोडलेली नाळ आणि दुसरीकडे बॉलिवूडचे वलय, असा हा थेट संघर्ष आहे. मावळसारख्या निसर्गरम्य भागात बड्या आसामींकडून होणाऱ्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. आता सोनाली बेंद्रेच्या निमित्ताने आणखी एका 'हायप्रोफाईल' जमीन वादाची यात भर पडली आहे. येत्या 20 एप्रिलच्या न्यायालयीन सुनावणीनंतरच या प्रकरणातील 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होणार असून, तोपर्यंत या प्रकरणातील गुंता कायम राहणार आहे. 

हेही वाचा: Sharad Ponkshe: 'कोणी दुखावलं गेलं असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा'; अभिनेते शरद पोंक्षेंनी 'त्या' वक्तव्यावर मागितली माफी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number