वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जुगाड, चमचा, सूर्य नमस्कार यांसारख्या रोजच्या वापरातील 70 भारतीय शब्दांचा समावेश जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये वडा, गुलाबजाम, खीमा यांसारख्या खाद्यपदार्थांचाही समावेश आहे. तेलुगू, उर्दू, तमिळ, हिंदी आणि गुजराती भाषेतील 70 भारतीय शब्दांना ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या नव्या आवृत्तीत स्थान देण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात डिक्शनरीत या नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.
दरवेळी विविध भाषांमधील नवनवीन शब्द, स्थानिक शब्द यांची भर ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या नव्या आवृत्तीत केली जाते. दर तीन महिन्यांनी नवीन शब्दांचा समावेश शब्दकोषात होतो. एखादा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीत समाविष्ट करण्यासाठी किमान दहा वर्ष संबंधित भाषेत वापरात असावा लागतो. तर आता आपल्या रोजच्या वापरातील शब्दांचा समावेश ऑक्सफर्ड डिक्शनरीत होणे हे खूपच कौतुकास्पद आहे.