जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी, धुलिवंदन साजरे होत असते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील भोयरे येथे धुलिवंदन एकमेकांना दगड मारुन साजरे केले जाते. याला जगदंबा देवीचा दगडफेकीचा खेळ असे म्हणतात. याला परंपरा असून, हा खेळ भाविक आनंदाने खेळत असतात.
भोयरेमध्ये धुलिवंदन दिवशी दुपारी 4 ते 5 च्या दरमान्य श्री जगदंबादेवीच्या पावन नगरीमध्ये आलेले भाविक मंदिरातून दर्शन घेऊन पुजाऱ्यासह भोगावती नदीच्या दिशेने जातात. नदीमध्ये लहान मुलांच्या कुस्त्या होतात. त्यानंतर सर्व भाविक गावाच्या वेशीवर येऊन दोन गटात विभागून दगडं मारतात. यानंतर ते दोन्ही गट जगदंबा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतात. एक गट मंदिराच्या गाभाऱ्यावर तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी उभा असतो. पुजारी मंदिरात पोहोचून खेळास परवानगी देताच दोन्ही गटांमध्ये तुफान दगडफेक सुरु होते. या दोन्ही गटामध्ये अंतर फक्त 150 ते 200 फूट असते. साधारण हा सामना 20 मिनिटे चालतो.
खेळ बंदचा इशारा होताच दोन्हीही गट दगड मारण्याचे बंद करुन मंदिरात दर्शन घेण्यासाठी रांगा लावतात. या होळीत दगड लागून जखमे झालेले भाविक दवाखान्यात जाऊन उपचार घेत नाही. त्या जखमेवर देवीचा अंगारा लावल्यास ती जखम बरी होत असल्याची भाविकांची भावना आहे.