सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात घडलेल्या तिहेरी हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका कुटुंबातील आई आणि तिच्या दोन मुलांवर मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या भीषण प्रकारात तिघांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांमध्ये गायत्री सुधाकर मस्के, त्यांची मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराय मस्के यांचा समावेश आहे. प्रिया बारावीमध्ये शिक्षण घेत होती, तर शिवराय दहावीचा विद्यार्थी होता. दोघांनी नुकत्याच बोर्डाच्या परीक्षा दिल्या होत्या. एका कुटुंबावर आलेल्या या दुर्दैवी संकटामुळे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.
मध्यरात्री घडला थरारक प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्ती घरात शिरली. त्यानंतर आई आणि दोन्ही मुलांवर तलवारीने सपासप वार करण्यात आले. हल्ला इतका भीषण होता की तिघांनाही बचावाची संधी मिळाली नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया यांचे मृतदेह घराच्या गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले, तर शिवरायचा मृतदेह बैठकीच्या खोलीत सापडला. घटनेचे स्वरूप पाहून नागरिकांच्या अंगावर काटा आला.
मालमत्तेच्या वादातून हल्ल्याचा संशय
या प्रकरणामागे मालमत्तेचा वाद कारणीभूत असू शकतो, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घरातील किंवा परिचयातील व्यक्तीनेच हा कट रचला असावा, अशी शक्यता तपास यंत्रणा तपासत आहे. पोलिसांकडून कुटुंबातील नातेवाईक, परिचित तसेच जुने वाद यांची माहिती घेतली जात आहे.
पोलीस घटनास्थळी, तपासाला वेग
घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. ठसेतज्ज्ञ, श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. गावात तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.