सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘काहीही झालं तरी भाजप ओबीसींना आरक्षण देणारच’, आगामी काळात ज्या कोणत्या निवडणुका होतील, त्यात २७ टक्के उमेदवारी ही ओबीसींना देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नाना पटोले म्हणाले, ओबीसींना भाजपपेक्षा अधिक आरक्षण महाविकास आघाडी सरकार देणार आहे. ‘भाजप ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणार असेल तर आम्ही ३० टक्के आरक्षण देऊ’, असे आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.
ओबीसी आरक्षणासाठी भाजपने अनेक आंदोलने केली आहेत. तसेच यापुढेही भाजप ओबीसींच्या आरक्षणासाठी लढत राहिल. तसेच यापुढे निवडणुकांसाठी ओबीसीला आरक्षण असो किंवा नसो, परंतु भाजप २७ टक्के तिकीट ओबीसी उमेदवारांना देणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली.
ओबीसी राजकीय आरक्षणावर बुधवारी सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. रखडलेल्या निवडणुका दोन आठवड्यात घोषित करा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने मविआला दिली आहे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण अडचणीत आले असून राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची शक्यता आहे.