मुंबई, २८ एप्रिल २०२३, प्रतिनिधी :शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अंकुशने या सिनेमात शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. जेव्हा चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा शाहिरांच्या गेटअप मधीलअंकुश चौधरीचा एक फोटो प्रकाशित करण्यात आला. तेव्हा अंकुशला पाहून हा चित्रपट नेमका कसा असेल याबाबत सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली होती. तर अंकुश चौधरीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सामायिक केला यामध्ये त्याच्या प्रवासबद्दल त्याने थोडक्यात सांगितलं आहे.
तो म्हणतोय की ,शाहिरांचा जीवनप्रवास चित्रपटातून उलगडावा, त्यांचे नाव पुसले जाऊ नये या हेतूने केदारने चार वर्षांपूर्वी चित्रपटाची योजना आखली होती. दीड वर्षांपूर्वी जेव्हा तू शाहीर करतोयस असं जेव्हा अंकुशला सांगण्यात आलं. तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशी होती की,मला हे पचवायलाच वेळ गेला की मी शाहीर कसा दिसेल.एक बेसूर मुलगा, नेहमी बाबांच्या मागे उभा राहणारा. तेव्हा ते माझ्याकडे नेहमी बघायचे. कारण मी अतिशय बेसूर गात होतो. पण मी परत भानावर यायचो आणि फक्त तोंड उघडून हातवारे करायचो जणू मीच हे गाणं गातोय असं दाखवायचो. हे सगळं मी करायचो, मला अजूनही आठवतं.
जेव्हा पेहराव तयार झाला तेव्हा मी आरशासमोर होतो. जेव्हा मी स्वतःला बघितलं तर मागे केदारच्या डोळ्यात पाणी होतं. माझ्या डोळ्यात पाणी होतं, तिथं जेवढी लोकं मागे उभी होते त्यांनी बाबांना बघितलं होतं, त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. तर मला असं वाटतं तिथूनपासूनचा आतापर्यंतचा प्रवास एक वेगळा अनुभव आहे.असं म्हणत त्याने हा व्हिडीओ सामायिक केला.चाहत्यांनी अंकुशचा व्हिडिओ आणि चित्रपटातील भूमिका पाहून त्याच कमेंट्स मधून भरभरून कौतुक केलं.