नष्ट होत चाललेल्या दुर्मिळ खवले मांजरीची कातडी आणि व्हेल या माशाच्या उलटीची तस्करी करून ती विक्री करण्यासाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून ठाण्यात आलेल्या त्रिकुटाला कोट्यावधीच्या मुद्देमालासकट पोलिसांनी अटक केलं आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने ठाण्यातील खारेगाव येथे सापळा रचून या त्रिकुटाला रंगेहाथ पकडलं. त्यांच्याकडे असलेल्या खवले मांजराचे खवले आणि व्हेल माशाची उलटी असा तब्बल 20 कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे
अटक आरोपींमध्ये काशिनाथ तुकाराम पवार, दिलीप महादेव बिर्जे, ज्ञानेश्वर गोविंद मोरे अशा तिघांचा समावेश असून पोलिसांनी अटक केल्यांतर त्यांच्या अंगझडती मध्ये पोलीस पथकाला पुढील गोष्टी आढळून आल्या.
20 लाख रुपये किमतीचे खवले मांजर याच्या शरीरावरील मोठ्या आकाराचे सुमारे 6 किलो खवले, काशिनाथ पवार या आरोपीकडे सापडले.
तर 10 किलो 900 ग्राम वजनाची, 30 सेमी लांबीची आणि 20 सेमी रुंदीची व्हेल माशाची उलटी आरोपी दिलीप बिर्जे याच्याकडील कापडी पिशवीत आढळून आली. या उलटीची किंमत 20 कोटी रुपये इतकी आहे. व्हेल माशाच्या उलटीमधून निघणाऱ्या दगडाचा लुब्रिकंट आणि परफ्युम इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर खवले मांजराच्या अंगावरील खवल्यांचा वापर कातडी वस्तू तयार करण्यासाठी केला जातो.
मुदेमालात एक टोयोटो कार आणि चार मोबाईल असा मुद्देमाल सापडला. यातील खवले मांजराचे खवले आणि माशाची उलटी याची आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधीची किंमत आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अटक केलेल्या आरोपीं यांनी आतापर्यंत आणखी वस्तू विकल्या आहेत का, तसंच ठाण्यात या वस्तू कुणाला विकण्यासाठी हे आरोपी आले होते, याचा सखोल तपास करत आहेत.
आरोपींना न्यायलयात नेले असता त्यांना 6 आक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायलयाने दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.