सांगली : भारतीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय चेहरेपैकी एक असलेली स्मृती मानधना आणि संगीतविश्वातील तरुण कंपोझर पलाश मुच्छल यांच्या लग्नाला आता काहीच तास उरले आहेत. पण या लग्नाभोवती निर्माण झालेल्या वातावरणात एक अनोखी चर्चा आणि त्याचवेळी हलकीशी उत्सुकता जाणवते. कारण हे लग्न ना बॉलिवूडसारखं भव्य आहे, ना स्टारडमने भरलेलं. उलट, या संपूर्ण सोहळ्यात काहीतरी ‘विशेष’ दडलेलं असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
स्मृतीची इच्छा होती की तिचं लग्न गावी आणि साधेपणात व्हावं आणि नेमकं तिच्या इच्छेनुसार सांगलीतील सयाजी हॉटेलमध्ये घडत आहे. सर्व विधी पूर्ण झाले असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत, परंतु या उत्साहाच्या गर्दीत एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेते. लग्नातील पाहुण्यांची संख्या फक्त 140! एवढं मोठं सेलेब्रिटी लग्न पण एवढा मर्यादित सोहळा? यामुळेच उत्सुकता अजून वाढली आहे. पलाश मुच्छलने काही दिवसांपूर्वीच हे स्पष्ट केलं होतं की त्यांचं लग्न “इंटिमेट अफ्टरनून वेडिंग” असेल. शांत, मर्यादित आणि पूर्णपणे कुटुंबकेंद्रित.
दोन्ही बाजूंनी फक्त 70- 70 असे मिळून 140 पाहुण्यांनाच निमंत्रण आहे. स्मृतीसोबत विश्वचषक खेळाडू काही जणी पोहोचल्या असल्या तरी मोठे सेलिब्रिटी, उद्योगपती, किंवा चित्रपटसृष्टीतील दिग्गज कोणीच दिसणार नाहीत. हीच गोष्ट या लग्नाभोवती रहस्याची एक वेगळी छटा निर्माण करते. पलाशच्या कुटुंबातील इंदूर येथील सुमारे 20 सदस्य सांगलीत पोहोचले असून, हळदी समारंभात त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. पण स्मृतीच्या बाजूने अद्याप कोण उपस्थित राहणार याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
भारतीय महिला संघातील काही निवडक खेळाडू उपस्थित राहणार असल्याचं कळतं, परंतु पाहुणे कोण याबाबत ‘सस्पेन्स’ जाणवतो. या सगळ्यात आणखी एक गोष्ट चर्चेत आहे. स्मृती आणि पलाश यांच्यातील वयाचा फरक. अनेकांना वाटत होतं की हे अंतर जास्त असेल; पण प्रत्यक्षात फरक फक्त एक वर्ष आणि तीन महिने. पलाशचा जन्म 22 मे 1995, तर स्मृतीचा 18 जुलै 1996. वयातल्या या कमी अंतरामुळेही त्यांच्या नात्यातील परस्पर स्नेह सहज समजतो.
सांगलीतील हे साधं पण अर्थपूर्ण लग्न, दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेवर भर देत, एका स्टार क्रिकेटर आणि एका प्रतिभावंत संगीतकाराच्या आयुष्यातील नवा पर्व सुरू करू पाहत आहे. मोठ्या प्रकाशझोतापासून दूर, पण चाहत्यांच्या प्रेमाने आणि जवळकीने भरलेला हा सोहळा नेमका कोणत्या खास क्षणांचा साक्षी होईल. हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.