शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेश बंदीचं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. प्रवेश बंदीचं समर्थन करताना त्यांनी सरळ सॅनिटरी नॅपकिनचेच उदाहरण दिले. रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाऊ शकता का, असा प्रतिसवालही त्यांनी केला. भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा अधिकार आहे मात्र याचा अर्थ कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकारही मिळतो असं नव्हे, असं वक्तव्य स्मृती इराणी यांनी केलं आहे.
ब्रिटिश उपउच्चायुक्त, मुंबई आणि ‘ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन’द्वारे आयोजित ‘यंग थिंकर्स कॉन्फरन्स’मध्ये त्या बोलत होत्या. स्मृती इराणी म्हणाल्या, “भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला आपापल्या धर्माचे पालन, पूजा अर्चना करण्याचा अधिकार आहे. मी स्वतः हिंदू आहे. मात्र माझे पती आणि माझी दोन्ही मुले पारशी म्हणजे झोराष्ट्रीयन धर्माचे सदस्य आहेत.
त्यामुळे मला माझ्या मुलं आणि पतीबरोबर त्यांच्या प्रार्थनास्थळालाही एकत्र भेट देता येत नाही, आणि ही परिस्थिती मला पूर्णतः मान्य आहे. कारण मला त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा, प्रार्थनेचा अधिकार मान्य आहे. त्यामुळेच भारतामध्ये सर्वांना धर्मस्वातंत्र्य आणि प्रार्थनेचा अधिकार आहे पण कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार नाही हे लक्षात घ्यायला हवं.”
‘केंद्रीय मंत्री असल्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात आपण काही बोलणार नाही मात्र मासिक पाळीमध्ये तुम्ही देवळात कसं काय जाऊ शकता’, असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे. या वक्तव्यातून अप्रत्यक्षपणे शबरीमाला मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशबंदीचं समर्थन केलं आहे.
स्मृती इराणी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.