मुंबई, १६ मे २०२३, प्रतिनिधी : राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार घडत असताना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार घडला. उरुसादरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर इतर धर्मियांकडून चादर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. याप्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. तसेच, मागील वर्षीदेखील त्र्यंबकेश्वर मंदिरात जमाव आत शिरल्याची कथित घटना घडली होती. या दोन्ही प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात येणार आहे.
दरम्यान, याप्रकरणी नाशिक पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच घुसखोरी करणाऱ्य जमावावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ब्राम्हण महासंघाने दिला आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर फलक लावण्यात आले आहेत. हिंदूंशिवाय मंदिरात कोणी प्रवेश करू नये या आशयाचे फलक मंदिरासमोर लावण्यात आले आहे. मंदिरात पहिल्यांदाच अशा प्रकारे घटना घडल्यामुळे या मागचा हेतू नेमका काय आहे, याची चौकशी करण्याची मागणी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी केली आहे.