Shrikant Shinde Convoy Accident : शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ताफ्यातील चार वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अण्णाभाऊ साठे चौकात घडला अपघात
श्रीकांत शिंदे हे सध्या राज्यभर ‘शिवसंवाद दौरा’ करत असून त्यानिमित्त ते नांदेड दौऱ्यावर आले होते. बुधवारी रात्री त्यांनी नांदेड उत्तर, दक्षिण आणि लोहा-कंधार मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी सकाळी नायगाव येथे आयोजित बैठकीसाठी ते आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह रवाना झाले होते. दरम्यान, सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ताफा शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातून जात असताना अचानक एक दुचाकी समोर आली. संभाव्य अपघात टाळण्यासाठी ताफ्यातील पुढील वाहनाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागील चार गाड्या एकमेकांना धडकल्या.
हेही वाचा – Second Hand Vehicle: जुनी वाहनं खरेदी-विक्री करताय? पुण्यात सेकंड हँड वाहन विक्रेत्यांसाठी नवे नियम लागू
वाहनांचे मोठे नुकसान
या धडकेत ताफ्यातील चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातग्रस्त गाड्यांमध्ये काही कार्यकर्ते तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी प्रवास करत होते. मात्र, कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.