मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने अप्रतिम झेल घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हार्दिक पंड्या धोकादायक ठरत असताना मार्को जान्सेनच्या 18व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हा झेल पाहायला मिळाला. हार्दिकने त्याआधीच एक षटकार मारला होता आणि तो मोठी खेळी करेल असे वाटत होते.
मार्को जान्सेनचा चेंडू हार्दिकने लाँग-ऑनच्या दिशेने हवेत मारला. चेंडू सीमारेषेबाहेर जाणार असे वाटत असतानाच श्रेयस अय्यरने धावत येत हवेत झेप घेतली. त्याने हवेत असतानाच रिव्हर्स कप पद्धतीने चेंडू पकडला आणि तोल जात असल्याचे लक्षात येताच सीमारेषेआधी झेवियर बार्टलेटच्या दिशेने चेंडू फेकला. त्यानंतर बार्टलेटने झेल पूर्ण केला. रिप्लेमध्ये अय्यरने योग्य वेळी चेंडू सोडल्याचे स्पष्ट दिसले.
हा झेल पूर्ण झाल्यानंतर श्रेयस अय्यरने मुंबईच्या प्रेक्षकांकडे पाहत टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. स्कोअरकार्डमध्ये हार्दिक पंड्या झेवियर बार्टलेटकडे झेलबाद झाल्याचे नोंदले गेले असले, तरी प्रत्यक्षात हा झेल श्रेयस अय्यरचाच मानला जात आहे.
SHREYAS IYER, WHAT HAVE YOU DONE!! ? ? One of the best catches you would see in the #TATAIPL history ?? Updates ▶️ https://t.co/Fn2dxJ4zYR#KhelBindaas | #MIvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/6EKgHR82cL — IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026
दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी क्विंटन डी कॉकने शानदार शतक झळकावले. त्याने 60 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. नमन धीरनेही 50 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. सुरुवातीला मुंबईची अवस्था 3 षटकांत 15 धावांत 2 बाद अशी झाली होती, मात्र डी कॉकने डाव सावरला.
पंजाबकडून अर्शदीप सिंगने सुरुवातीला भेदक मारा करत 3 विकेट घेतल्या. त्याने 22 धावांत 3 फलंदाज बाद केले. त्यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत हे लक्ष्य 17 षटकांपूर्वीच गाठले आणि मुंबईला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.