मुंबई, ८ मे २०२३, प्रतिनिधी : कोकणातील चिपळूणमधील खेर्डी परिसरात पहिल्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्यात उद्धव गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी तुफान फटकेबाजी केली. कोकणात कुस्तीची परंपरा नाही. मात्र, या कुस्ती स्पर्धेअंतर्गत कोकणात नवा खेळ पुढे येत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. दरम्यान, प्रत्यक्ष कुस्ती खेळता येत नसली तर राजकारणात अनेकांशी कुस्ती खेळतो आणि यापुढेही खेळेन, असा इशारा भास्कर जाधव दिला आहे.
भास्कर जाधव म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात राजकीय कुस्ती सुरू आहे. पण, आम्ही कब्बडीचे खेळाडू असल्यामुळे कोणाला कसे चितपट करायचे याचा अभ्यास आहे. कुस्तीची कला अवगत झाल्यास कोणाला कधी आणि विरोधकांची पाठ कशी जमिनीला टेकवायची याची कलाही आम्ही अवगत करू असे जाधव म्हणाले. राजकीय जीवनातील चाळीस वर्षात विविध प्रकारचे अनेक पैलवान माझ्या अंगावर आले. त्या सर्वांना मी लाल माती दाखवली आहे. प्रत्यक्ष कुस्ती खेळता येत नसली तरी राजकारणात अनेकांशी कुस्ती खेळतो आणि खेळेन, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी निशाणा साधला. तसेच, कोकणाला कुस्तीची परंपरा नाही, पण आता कोकणात नवा खेळ पुढे येतोय ही आनंदाची बाब, असे म्हणत भास्कर जाधव यांनी कौतुकही केले.’
दरम्यान, भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. नारायण राणेंच्या सभेला पन्नास माणसंदेखील जमत नाहीत, अशा माणसाच्या टीकेवर आम्हाला प्रश्न विचारू नये, असे म्हणत भास्कर जाधव यांनी राणेंवर टीका केली. शेतकरी परिषदेत दहा हजार माणसं बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, नारायण राणेंच्या भाषणाला पंधार माणसेही नव्हती. उद्धव ठाकरे यांनी सभा किंवा पत्रकार परिषद घेतल्यावरच राणे बोलतात, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.